हर्षवर्धन पाटलांचे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इंदापूरात आजही बेमुदत धरणे आंदोलन सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 13:44 IST2021-11-28T13:44:25+5:302021-11-28T13:44:49+5:30
शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी

हर्षवर्धन पाटलांचे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इंदापूरात आजही बेमुदत धरणे आंदोलन सुरु
बारामती : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र ११ दिवस झाले तरी शेतीचा वीजपुरवठा सुरु केला जात नसल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (27) सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महावितरण कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांनी काल रात्री मुक्काम केला. आज रविवारी दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू होईपर्यंत माझे धरणे आंदोलन चालूच राहील, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनस्थळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे व भाजपचे पदाधिकारी व शेतकरी हे हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत.