Happy Eid-ul-Fitr 2023: प्रेम, माणुसकीचा धागा मजबूत करणारा ‘रमजान’; मुस्लिमेत्तर बांधवांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 03:55 PM2023-04-22T15:55:47+5:302023-04-22T15:58:21+5:30

‘रमजान’च्या निमित्ताने अनेक हिंदू आणि इतर धर्मीय बांधवांच्या ‘रमजान’शी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला...

Happy Eid-ul-Fitr 2023 'Ramadan' that strengthens the thread of love, humanity; Memories evoked by non-Muslim brothers | Happy Eid-ul-Fitr 2023: प्रेम, माणुसकीचा धागा मजबूत करणारा ‘रमजान’; मुस्लिमेत्तर बांधवांनी जागवल्या आठवणी

Happy Eid-ul-Fitr 2023: प्रेम, माणुसकीचा धागा मजबूत करणारा ‘रमजान’; मुस्लिमेत्तर बांधवांनी जागवल्या आठवणी

googlenewsNext

- रोशन मोरे

पिंपरी : सण कोणत्याही धर्माचा असो तो आनंदाने एकत्रित साजरा करण्याची शिकवण आहे. ‘रमजान’च्या निमित्ताने अनेक हिंदू आणि इतर धर्मीय बांधवांच्या ‘रमजान’शी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, धर्म कोणताही असो त्यातील प्रत्येक सणाचा हाच संदेश आहे की माणुसकी, प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. ईदच्या निमित्ताने हा प्रेमाचा, माणुसकीचा धागा अजून मजबूत व्हावा.

तृतीयपंथी छायाचित्रकार झोया लोबो यांनी सांगितले की, मी कॅथलिक परिवारात वाढले; पण सर्व धर्माचे सण थाटात करते. मुंबईतील माहीम भागात मी राहत होते. मी राहायचे त्या खोलीसमोर एक मुस्लीम कुटुंब राहत होते. त्या घरात एक लहान मुलगी होती. मला जाणवलं उद्या ईद आहे, सगळे नवीन कपडे घेत आहेत आणि त्या मुलीचा चेहरा हिरमुसला आहे. मी त्यावेळी मागून माझं पोट भरायचे; पण ईदच्या आदल्या रात्री मी माझ्याकडे जे साठवलेले थोडेफार पैसे होते, ते घेतले आणि तिच्यासाठी रात्री जाऊन एक ड्रेस घेऊन आले. जो तिने चाँद रात्रीला घातला. दुसऱ्याला आनंद देणे यातच माणुसकी आहे.

ईदची एक महत्त्वाची आठवण म्हणजे मुंबई विद्यापीठात आम्हाला एक सिनिअर होते नाबिक इनामदार. त्यांच्याकडे मला प्रथम इदी मिळाली. त्यांनी मला इदी काय प्रथा आहे ते सांगितले. मग मी त्यांना म्हणालो मी आता दर ईदला येऊन इदी घेणार आहे. आमचे मित्र राजकुमार तांगडे म्हणतात तुम्हाला एक तरी मुस्लीम मित्र हवा आणि तोही जवळचा. त्यांच्याशी प्रामाणिकपणे सहमत आहे.
- प्रवीण डाळिंबकर, अभिनेता

पूर्वी ईद म्हणा किंवा दिवाळी दहा ते १५ दिवस चालायची. आता त्याला इतके मोठे स्वरूप राहिले नाही. जग बदलेल तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पण, आजही मला ईद पुण्यात साजरी करताना शाळकरी वयात व्हायचा तसाच आनंद होतो. शाळेतील सर्व मित्र आठवतात. पुण्यात काम करताना अनेक मुस्लीम बांधवांकडून निमंत्रण असते.
- राजेंद्र बहाळकर, सेक्रेटरी, हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूट

दरवर्षी येणाऱ्या ईदला प्रामुख्याने आठवण येते ती लहानपणीचा मित्र युसूफची. सण कोणत्याही धर्माचा असला तरी तो आपलाच सण आहे, या पद्धतीने साजरा केला जात होता. आता प्रत्येकांनी जाती, धर्माच्या भिंती स्वतःभोवती बांधून ठेवल्यात. ज्या वयात आपल्याला जाती, धर्माचे काही देणे-घेणे नव्हते तोच काळ किती चांगला होता, असे आता वाटते.
- के. अभिजित, राइट टू लव्ह

Web Title: Happy Eid-ul-Fitr 2023 'Ramadan' that strengthens the thread of love, humanity; Memories evoked by non-Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.