Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 02:40 PM2024-05-12T14:40:13+5:302024-05-12T14:52:40+5:30

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत.

Arvind Kejriwal 10 guarantees by aap for india development lok sabha elections 2024 | Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी

Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. यासोबतच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास 10 वेगवेगळ्या मार्गांनी होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत यासाठी 10 गॅरंटी दिल्या आहेत. काय आहेत ते जाणून घेऊया...

1. 24 तास मोफत वीज

देशात 24 तास वीजपुरवठा होईल. देशाची सर्वाधिक मागणी 2 लाख मेगावॅट आहे. 3 लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची आमची क्षमता आहे, मात्र खराब व्यवस्थापनामुळे वीजपुरवठा खंडित होतो. आपचं सरकार आल्यावर देशातील गरिबांना मोफत वीज दिली जाईल. एका वर्षात सव्वा लाख कोटींचा खर्च येईल जो सरकार देईल. गरिबांना 200 युनिट वीज मोफत दिली जाईल.

2. सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण

देशभरातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल. सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल. देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवणार. हे काम पूर्ण करण्यासाठी 5 लाख कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी दरवर्षी 5 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. अर्धा खर्च केंद्र आणि अर्धा राज्य सरकार उचलणार आहे.

3. मोफत जागतिक दर्जाचे उपचार

मोहल्ला क्लिनिक देशभरात उघडले जातील. यामध्ये गरीब आणि श्रीमंत दोघांसाठी उपचार मोफत असतील. उपचाराचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल तो सरकार उचलेल.

4. राष्ट्रीय सुरक्षा

चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला आहे पण केंद्र सरकारला हे वास्तव लपवायचे आहे. आपल्या सैन्यात खूप ताकद आहे. चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल. एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल आणि लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.

5. अग्निवीर योजना बंद करेल

अग्निवीर योजना चार वर्षांनंतर आपल्या तरुणांना काढून टाकते. अशा परिस्थितीत आपण लष्कराला कमकुवत करत आहोत. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येणार आहे. 

6. शेतकऱ्यांच्या पिकाचा दर निश्चित केला जाईल

जर जनतेने 'आप'ला केंद्रात निवडून आणलं तर आम आदमी पार्टी स्वामिनाथन अहवाल लागू करेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना एमएसपी मूल्य दिले जाईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

7. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा

केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

8. बेरोजगारी संपेल

वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. रिक्त जागा सोडल्या जातील आणि परीक्षा निष्पक्षपणे घेतल्या जातील.

9. भ्रष्टाचार संपेल

भाजपचे वॉशिंग मशीन चौकाचौकात उभे केले जातील आणि ते तोडले जाईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची सध्याची योजना रद्द केली जाईल. संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त होईल.

10. व्यवसायाचा विस्तार केला जाईल

भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक मोठे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करून परदेशात गेले आहेत, यामुळे देशाचे नुकसान होत आहे. देशामध्ये ज्याला व्यवसाय करायचा आहे तो करू शकतो.
 

Web Title: Arvind Kejriwal 10 guarantees by aap for india development lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.