Happy Birthday Pune Metro : दररोज मेट्रोमध्ये दीड लाख पुणेकर..! दिवसेंदिवस प्रवाशी संख्येत वाढ
By श्रीकिशन काळे | Updated: March 6, 2025 18:11 IST2025-03-06T18:10:44+5:302025-03-06T18:11:07+5:30
पुणे मेट्रोची सुरवात ६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. त्यानंतर आपल्या नेटवर्कचा विस्तार करून, पुणेकरांसाठी एक वेगवान

Happy Birthday Pune Metro : दररोज मेट्रोमध्ये दीड लाख पुणेकर..! दिवसेंदिवस प्रवाशी संख्येत वाढ
पुणे : पुणेमेट्रोला तीन वर्ष पूर्ण झाले असून, पुणेकरांना पर्यावरणपूरक, आरामदायी आणि प्रदूषणविरहित प्रवास करण्याचा आनंद मिळत आहे. दैनंदिन प्रवासी संख्येतही वाढ होत असून, सध्या दीड लाखांहून अधिक पुणेकर मेट्रोचा वापर करत आहेत.
पुणे मेट्रोची सुरवात ६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. त्यानंतर आपल्या नेटवर्कचा विस्तार करून, पुणेकरांसाठी एक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वानझ ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली. पुणे मेट्रोच्या सुरुवातीच्या काळात २१ लाख ४७ हजार ७५७ प्रवासी होते (मार्च २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत).
त्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते रूबी हॉल क्लिनिक आणि गरवारे कॉलेज ते जिल्हा न्यायालय या मार्गिकांच्या उद्घाटनानंतर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि १ कोटी २३ लाख २० हजार ०६७ झाली. रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ झाली. पुणे मेट्रोची दररोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे १ लाख ६० हजार आहे.
प्रवाशांसाठी सुविधा ...!
पुणे मेट्रो उच्च सुरक्षा मानकांसह आरामदायक, वातानुकूलित प्रवास देत असून, सीसीटीव्ही देखरेख, कोचमध्ये पॅनिक बटन्स, चांगल्या प्रकाशमान स्थानक क्षेत्रे, बॅगेज स्कॅनिंग सुविधा उपलब्ध करून दिली.
भविष्यातील मार्गिका ..!
फेज-१ आणि विस्तारांमध्ये, पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांचा (३३.१ किमी) आधीच कार्यप्रणालीत आहे, तर पीसीएमसी ते निगडी विभाग सध्या बांधकामाधीन आहे. याआधी स्वारगेट ते कात्रज विस्तार (५.५ किमी) टेंडर प्रक्रियेत आहे.
फेज-२ (नवीन मार्गिका)
-वनाज ते चांदणी चौक (१.१२ किमी, २ स्थानके)
-रामवाडी ते वाघोली/विठलवाडी (११.६३ किमी, ११ स्थानके)
-खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खाराडी (३१.६४ किमी, २८ स्थानके)
-नळ स्टॉप ते वारजे - माणिकबाग (६.१२ किमी, ६ स्थानके
-हडपसर ते लोणी काळभोर (१६.९२ किमी, १४ स्थानके) आणि हडपसर ते सासवड रस्ता (५.५७ किमी, ४ स्थानके)
(भारत सरकारकडून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत)
पुणे शहरात सुरक्षित, वेगवान, आरामदायक, विश्वासार्ह आणि टिकाऊ शहरी वाहतूक उपलब्ध करुन देण्यात पुणे मेट्रोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुणे मेट्रो विस्तारित मार्ग आणि फेज-२ मेट्रो नेटवर्कवर शहराचा जास्तीत जास्त भाग जोडला जाईल. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो