शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:43 PM2018-03-23T13:43:49+5:302018-03-23T13:43:49+5:30

राज्यभर ठिकठिकाणी तांत्रिक विद्यालये असून अन्य शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहेत.

Hanging sword on government technical schools | शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार

शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षक, कर्मचारी धास्तावले : अधिकारी म्हणतात, केवळ अभ्यासक्रम अद्ययावत होणार नवीन अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा

राजानंद मोरे 
पुणे : राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालये बंद करून त्याठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा व्यवसाय प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसे स्पष्टपणे नमूदही करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यालयांमधील शिक्षक व कर्मचारी धास्तावले आहेत. 
राज्यात १९६०पासून शासकीय तांत्रिक विद्यालये सुरू झाली असून, सध्या सुमारे ५३ विद्यालये आहेत. त्यावेळी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे तांत्रिक विषय सुरू करण्यात आले. त्यानंतर १९७८ पासून कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तर १९८७ पासून किमान कौशल्यावर आधारित (एमसीव्हीसी) अभ्यासक्रम सुरू झाले. सध्या द्विलक्षी अभ्यासक्रमांचे काही विषय फक्त शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्येच सुरू आहेत. राज्यभर ठिकठिकाणी तांत्रिक विद्यालये असून अन्य शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहेत. बहुतेक विद्यालयांमध्ये ‘एमसीव्हीसी’ हा दोन वर्षांचा दहावीनंतरचा अभ्यासक्रम आहे. ही विद्यालये बंद करून त्याठिकाणी नवीन अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) विस्तार आराखडा तयार करण्याविषयी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दि. १९ मार्च रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये शासकीय तांत्रिक विद्यालयांची सद्यस्थिती, अभ्यासक्रमांवर चर्चा करण्यात आली आहे. ‘विद्यमान शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेले व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून तिथे उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयीसुविधांचा अभ्यास करून (उदा. जागा, वीज, यंत्रसामग्री) नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा व्यवसाय प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय) सुरू करणे’ असे निर्देश प्रधान सचिवांनी दिल्याचे इतिवृत्तामध्ये आहे.याबाबतचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षणच्या पाच विभागीय सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.
शिक्षकांशी चर्चा नाही
तिवृत्तानुसार तांत्रिक विद्यालये बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसते. याबाबत आपल्याशी कसलीही चर्चा न करता गोपनीय पद्धतीने विद्यालयांतील अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अद्याप एकदाही विश्वासात घेतले नसल्याचे काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

.......................

तांत्रिक विद्यालये बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही. रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये तांत्रिक विद्यालयांचे काय करायचे, याचा विचार सुरू आहे. ‘एमसीव्हीसी’च्या काही शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये केवळ तीन-चार प्रवेश आहेत. त्यामुळे साधनसामग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. कोणत्याही शिक्षक, संस्थेला हात न लावता संस्थांमधील सध्याचे अभ्यासक्रम अद्ययावत करून ते रोजगारक्षम करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. तांत्रिक विद्यालयाऐवजी ‘आयटीआय’ किंवा ‘व्हीटीआय’ असे नाव दिले जाऊ शकते. 
- अनिल जाधव, संचालक, 
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
 

Web Title: Hanging sword on government technical schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.