Pune Crime | कात्रजमध्ये कोयत्याने वार करून मनगटापासून तोडला हात; परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:58 IST2023-03-24T14:58:37+5:302023-03-24T14:58:46+5:30
सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा पंजा पुन्हा जोडला...

Pune Crime | कात्रजमध्ये कोयत्याने वार करून मनगटापासून तोडला हात; परिसरात भीतीचे वातावरण
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणांवर केलेल्या हल्ल्यात कोयत्याने वार करून एकाचा मनगटापासून पुढील पंजाच तोडला. हा धक्कादायक प्रकार कात्रज येथे भरदिवसा घडला. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा पंजा पुन्हा जोडला.
याबाबत अभिजित दुधनीकर (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आकाश चाबुसकर, रोहित बोद्रे, प्रेम गुंगारगे, कविराज देवकाते, युवराज देवकाते व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुखसागर येथील स्मार्ट मेन्स पार्लरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, आकाश चाबुसकर व त्याचे साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याविरुद्ध फिर्यादी यांनी पूर्वी तक्रार केली होती. फिर्यादी व लाडप्पा हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना वाटेत अडविले. तुम्ही केस करता का आमच्यावर? थांबा आता तुमचा मर्डरच करतो, असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांना पकडून सपासप वार केले. फिर्यादी पळून जात असताना त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाडप्पा याच्यावर वार केला. तेव्हा त्याने डावा हात पुढे केला. त्यावर वार झेलला. त्यात त्याचा मनगटापासून पंजा तुटला. उजव्या हाताच्या पंजावरही वार करून गंभीर जखमी केले. दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी लाडप्पा याचा पंजा जोडला असल्याचे सांगण्यात आले.