Pune Municipal Corporation: गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याच्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:05 IST2022-04-01T21:05:30+5:302022-04-01T21:05:36+5:30
पुणे महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली

Pune Municipal Corporation: गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याच्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. १० जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची मुदत ३१ मार्चला संपली असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त ७७ प्रस्ताव दाखल झाले आहेत.
राज्य शासनाने गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने १० जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत हद्दीतील गुंठेवारीतील मिळकतधारकांकडून प्रस्ताव मागविले होते. या कालावधीत ७७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. वास्तविकत: शहरातील विविध भागांमध्ये छोट्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
यासाठीच्या अटी व शर्तींमुळे तसेच किचकट प्रक्रियेमुळे अनेकांनी पाठ फिरविली आहे. हे प्रस्ताव आर्किटेक्ट अथवा इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागणार असून त्यांची फी परवडत नसल्यानेही अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने ५ हजार रुपये फी आकारावी, असे आवाहन केले आहे.