महापालिकेमध्ये पिस्तूलधारकांचा वावर वाढला, मिळकत कर थकबाकी प्रकरणी एकाने स्वतःच्याच डोक्याला लावली पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:34 IST2026-02-14T01:33:28+5:302026-02-14T01:34:07+5:30
या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

महापालिकेमध्ये पिस्तूलधारकांचा वावर वाढला, मिळकत कर थकबाकी प्रकरणी एकाने स्वतःच्याच डोक्याला लावली पिस्तूल
पुणे : महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेत नवख्या नगरसेवकांचा आणि त्यांच्या नवनवीन वाहनांचा जसा वावर वाढला आहे, तसाच पिस्तूल बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांचाही वावर वाढला आहे. मिळकत कर थकबाकी प्रकरणी महापालिकेत चकरा मारणाऱ्या एकाने पिस्तूल काढून थेट स्वत:च्या डोक्याला लावल्याची घटना शुक्रवारी दुपारी महापालिकेतील मिळकत कर विभागाच्या कार्यालयात घडली.
या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. महापालिकेतील चार वर्षाच्या प्रशासकराज नंतर नुकतेच महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत १६५ पैकी जवळपास शंभर नगरसेवक नवखे असून पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पोहचले आहेत. नवीन नगरसेवकांमध्ये काही गुंठा मंत्र्यांचाही समावेश असल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते महागड्या गाड्यांमधून महापालिकेत येतात. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात नवनवीन आणि महागड्या गाड्यांचा वावर दिसतो. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे पिस्तूलधारक कार्यकर्त्यांचाही वावर वाढलेला दिसत आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवेळी काही कार्यकर्त्यांच्या कमरेला पिस्तूल सदृष्य वस्तू पहायला मिळाल्या.
त्यानंतर आता शुक्रवारी तर महापालिकेच्या मिळकत कर विभागात एकाने स्वत:च्या डोक्यालाच पिस्तूल लावल्याची घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तिचे कोंढवा-वानवडी भागात मंगल कार्यालय आहे. ते त्याने पाडून टाकले आहे. यानंतर मोकळ्या जागेचा कर लावण्यासाठी त्याने मिळकत कर विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार करून त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता देखिल दिली होती. हे बील काढण्याची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी तो व्यक्ती महापालिका भवनमधील बिल विभागात गेला होता. नवीन बिलाबाबत त्यांना संबधित महिला कर्मचारी माहिती देत असतानाच त्याने कमरेचे पिस्तूल काढून स्वत:च्या डोक्याला लावत आता मी गोळी मारून घेउ का? अशी धमकीवजा संताप व्यक्त केला. यामुळे तेथे असलेले कर्मचारी घाबरले. तातडीने इतर अधिकार्यांना बोलावून घेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना यापासून प्रवृत्त करत बाजूला नेले.
दरम्यान, या प्रकाराची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गांभीर दखल घेतली असून त्यांनी संबंधीत व्यक्तीच्या प्रस्तावाची माहिती घेतली. या प्रस्तावात सर्वच अधिकारी स्तरावरून निगेटीव्ह अभिप्राय आले होते. परंतू यातून लवकर मार्ग काढू असे अधिकार्यांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर संबंधिताने डोक्याला पिस्तूल लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांना कळविणार असल्याचे सांगितले. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधीत व्यक्तीची रितसर तक्रार दिली असून रात्री उशीरापर्यंत संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितले.
कोट महापालिका भवनमध्ये पिस्तूल आणणे आणि तो डोक्याला लावणे हा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात येणार असून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर मशिन बसवून येणाऱ्यांची व त्यांच्या गाड्यांची तपासणी करण्यात येईल. तसेच महापालिका प्रवेशद्वार व भवनाचील सुरक्षा कडक केली जाईल.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.
अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही व्यक्ती महापलिकेत कर भरण्यासाठी आली होती. कराची रक्कम पाहिल्यानंतर या व्यक्तीने हायपर होवून जीवाचे बरेवाईट करतो म्हणून पिस्तूल डोक्याला लावले. पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे.
- राकेश विटकर, सुरक्षा विभाग प्रमुख, महापालिका