तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

By नितीन चौधरी | Published: June 24, 2024 04:55 PM2024-06-24T16:55:15+5:302024-06-24T16:56:05+5:30

विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, असे निर्देश महारेराने दिले आहेत....

Grievance Redressal Cell only at 195 locations; Neglect of Maharera's directives by builders, warning of action | तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

पुणे : घरखरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील केवळ १९५ प्रकल्पांनी अशा कक्षांची स्थापना करून अपेक्षित तपशील संकेतस्थळावर नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, असे निर्देश महारेराने दिले आहेत.

घर खरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची मार्केटिंग यंत्रणा ग्राहकांच्या संपर्कात असते. मात्र, त्यानंतर काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते. परिणामी तक्रार सोडविताना ग्राहकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यातून अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्णतेतही अडचणी येऊ शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने सर्व विकासकांना दिले होते.

या कक्षात याच कामासाठी पूर्णवेळ किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्पस्थळी ठळकपणे प्रदर्शित करावे. शिवाय विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केलेली होती. या तक्रार निवारण कक्षांमुळे तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळायला मदत होईल. शिवाय विकासकांनी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले, याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकल्यास प्रकल्पाची विश्वासार्हता वाढण्यासही मदत होईल.

ग्राहकांच्या तक्रारींचे रितसर निवारण व्हावे, ग्राहकाला आपली गुंतवणूक संरक्षित आणि सुरक्षित आहे असा विश्वास वाटावा आणि बांधकाम क्षेत्राची विश्वासार्हता आणखी वाढावी, यासाठी या ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना ही काळाची गरज आहे. महारेरा त्यासाठी कटिबद्ध आहे. तक्रार निवारण यंत्रणा अस्तित्वात असणे ही काळाची गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊनच महारेराने प्रत्येक प्रकल्पात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या क्षेत्राची विश्वासार्हता वाढावी यासाठी सर्व संबंधितांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात येत आहे.

- अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Web Title: Grievance Redressal Cell only at 195 locations; Neglect of Maharera's directives by builders, warning of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.