झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:48 PM2021-08-12T23:48:25+5:302021-08-12T23:49:03+5:30

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये (ता. पुरंदर) सापडला आणि काही दिवसांपासून बेलसर गावाची चर्चा राज्यात झाली.

The gram panchayat felt condoms in pune because of Zika's fear; Avoid pregnancy for four months | झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार

झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार

googlenewsNext

- भरत निगडे

नीरा : झिका संसर्गाचा उद्भव झाल्यानंतर वैद्यकीय विभागाच्या सल्ल्यानुसार बेलसर ग्रामपंचायतीने चक्क निरोध (कंडोम) वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. पुरुषाच्या वीर्यात झिका विषाणू आढळत असल्याने महिलांनी किमान तीन महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असे वैद्यकीय सल्ला आहे. पुरुषांनी शक्यतो संभोग टाळावा किंवा सुरक्षित संभोग करावा, असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पुुरुषांना निरोध दिले जात आहेत.

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये (ता. पुरंदर) सापडला आणि काही दिवसांपासून बेलसर गावाची चर्चा राज्यात झाली. बेलसरमधील ५५ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बेलसर गावात पुढचे तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

झिकाची लागण एडिस एजिप्त डासापासून होते. झिकाची लागण झाल्यानंतर गरोदर महिलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. झिकामुळे बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते किंवा अकाली प्रसूती होण्याचा धोका असतो. म्हणून बेलसर गावात पुढचे तीन महिने कोणतीही महिला गरोदर राहू नये याची दक्षता घेण्याची सूचना वैद्यकीय विभागाने केली आहे. गावात फलक लावून याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील पहिली झिकाग्रस्त ५५ वर्षीय महिला फार त्रास न होता काही दिवसांत बरी झाली. बेलसर गावातील अन्य कोणाला झिकाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील तणाव हळूहळू कमी झाला. झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर राज्याच्या आरोग्य पथकाने गावाची पाहणी केली होती. त्यानंतर दिल्लीतून आलेल्या केंद्रीय पथकानेही बेलसरला भेट देऊन पाहणी केली होती.

गावाने कुठल्या उपाययोजना केल्या?

झिकाचा एकच रुग्ण बेलसरमध्ये सापडला असला तरी डेंग्यू आणि चिकनगुनियाचे १०४ रुग्ण गावात आढळले होते. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यास गावाने सुरुवात केली होती. वापराच्या पाण्यात औषध टाकून त्यात डास अंडी घालणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली. उपाययोजनांबाबत उपसरपंच धीरज जगताप म्हणाले, “झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात जनजागृती सुरु केली. भोंगा गाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. गावातल्या २४ गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले. या महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिकाग्रस्त आढळलेले नाही.”

“एडिस एजिप्त डास चावल्याने किंवा एखाद्या बाधित व्यक्तीसोबतच्या शारीरिक संबंधातून अशा दोन प्रकारे झिकाचा संसर्ग होऊ शकतो. पुरुषाच्या वीर्यात साधारण चार महिने झिकाचा विषाणू जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्या पुरुषामुळे होणारी गर्भधारणा ही झिका संसर्गग्रस्त असू शकते. त्यामुळेच पुढचे चार महिने गर्भधारणा टाळा किंवा निरोध वापरा, असे गावकऱ्यांना सांगत आहोत,” असे पुरंदर तालुका पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The gram panchayat felt condoms in pune because of Zika's fear; Avoid pregnancy for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.