गोवारीकरांनी ‘पानिपत’ करताना केला ‘विश्वास’घात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:26 PM2019-11-25T13:26:15+5:302019-11-25T13:50:15+5:30

बौध्दिक संपदेची चोरी केल्याचा आरोप

The Gowarikars used my scripted story for 'panipat' | गोवारीकरांनी ‘पानिपत’ करताना केला ‘विश्वास’घात

गोवारीकरांनी ‘पानिपत’ करताना केला ‘विश्वास’घात

Next
ठळक मुद्देविश्वास पाटील यांची उच्च न्यायालयात धावचित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटासाठी पूर्वपरवानगी न घेतल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग झाला असून, बौध्दिक संपदेची चोरी झाल्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स, निर्माते रोहित शेलाटकर, सुनिता गोवारीकर आणि रिलायन्स एंटरटेनमेंटकडून भरपाईची मागणी केली आहे. विश्वास पाटील यांच्या परवानगीशिवाय त्यांची ‘पानिपत’ ही लोकप्रिय कादंबरी आणि ‘रणांगण’ या नाटकातील प्रसंग, कथा आणि बरासचा भाग चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘लोकमत’शी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, माझ्या ‘पानिपत’ या कादंबरीतील आत्मा आणि ध्येयाचीच चित्रपटाद्वारे चोरी करण्यात आली आहे. कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. त्यापूर्वी पानिपतची लढाई म्हणजे पराभव, काळिमा असेच मानले जायचे. जबाबदार इतिहासकारांनीही याबाबात हिणकसपणे लिहिले. मी पानिपतबाबत खूप संशोधन केले, कागदपत्रांचा अभ्यास केला आणि त्यातील अभिमानास्पद बाब, लढवय्या भूमिका वाचकांसमोर आणल्या. ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर धक्काच बसला. वाड:मयचौर्याविरोधात न्याय मिळावा, यासाठी मी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान, रोहित शेलटकर हे लेखक संजय पाटील यांना भेटले आणि ‘पानिपत’विषयी चर्चा केली. संजय पाटील यांनी संहिता लिहिली आणि शेलटकर यांच्या मुंबईमधील आॅफिसमध्ये संहितेचे वाचनही झाले. संजय पाटील यांनी संहिता लिहिण्यापूर्वी विश्वास पाटील यांची परवानगीही घेतली होती. मात्र, कालांतराने रोहित शेलटकर यांनी संजय पाटील यांच्यापासून फारकत घेत विषयच थांबवला. 
‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर धक्काच बसला. आपल्या कादंबरीतील पात्रे, घटना, प्रसंग आणि बराचदा भाग पूर्वपरवानगीशिवाय चोरला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दिग्दर्शक, निर्मात्याकडून संहिता मागवून घेणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे विश्वास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘पानिपत’विषयी...
विश्वास पाटील यांना १९९२मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘महानायक’ आणि ‘झाडाझडती’ या त्यांच्या कादंबरीही वाचकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. ‘पानिपत’ ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन १९९१ मध्ये झाले. त्यानंतर गुजराती, पंजाबी, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये ‘पानिपत’ने ठसा उमटवला. भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये कादंबरीच्या जवळपास तीन लाख प्रतींची आजवर विक्री झाली आहे. विश्वास पाटील यांनी ‘पानिपत’ या कादंबरीवर आधारित ‘रणांगण’ हे नाटक लिहिले. वामन केंद्रे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. दिल्ली, जबलपूर, गोवा, हैदराबाद आणि इतर अनेक शहरांमध्ये ‘रणांगण’चे जवळपास ४०० प्रयोग सादर झाले. ‘पानिपत’ या कादंबरीपूर्वी इतिहासातील या घटनेकडे कधीच अभिमानाने पाहण्यात आले नव्हते. विश्वास पाटील यांनी या विषयावर तब्बल ८ वर्ष संशोधन केले. पानिपतच्या लढाईचे विविध कंगोरे बारकाईने जाणून घेतले आणि भाऊसाहेब या लढवय्याची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे, तर साºया देशाला करुन दिली.

......

बौध्दिक संपदेचे रक्षण करणे, मला महत्वाचे वाटते. कवी, लेखक यांना मिळणारे उत्पन्न खूप कमी असते. त्यामुळे ते शक्यतो कोर्टाच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते वाड:मयचौर्याचे धाडस करुन लेखकांचे नुकसान करतात. ‘पानिपत’च्या निमित्ताने दिग्दर्शक, निर्मात्यांना धडा शिकवावा, यासाठी मी हे पाऊल उचलले आहे.
- विश्वास पाटील

Web Title: The Gowarikars used my scripted story for 'panipat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.