राज्यात जातीय तेढ वाढण्याला सरकारच जबाबदार, मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:13 IST2022-04-25T15:11:06+5:302022-04-25T15:13:14+5:30
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र ...

राज्यात जातीय तेढ वाढण्याला सरकारच जबाबदार, मनसेचा आरोप
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र त्याला उशीर करून सरकारच राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे.
सरकारला राज्यात शांतता हवी असेल, तर त्यांनी भोग्यांसाठी विनाविलंब नियमावली तयार करावी, ती जाहीर करावी व त्याची अंमलबजावणीही करावी अशी मागणी मनसेने केली आहे. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सरकारच राज्यात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेवरही यात नाव न घेता टीका करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत भोंग्याविषयी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर भाष्य केले. त्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत दिली. त्यावर सरकारने हालचाल करायला हवी. तीन पक्षांच्या सरकारमध्ये तिघांचे विचार वेगवेगळे अशी स्थिती आहे. सरकारने भोंग्यांसाठी नियमावली जाहीर करावी, अन्यथा ३ मे ला सर्व मंदिरांमध्ये महाआरती होणारच आहे, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे.