Pahalgam Terror Attack: 'सरकार तुमच्या पाठीशी', पहलगाम येथे गेलेल्या पुण्याच्या ५२० पर्यटकांना विशेष विमानाने आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:47 IST2025-04-23T18:46:29+5:302025-04-23T18:47:13+5:30
पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक पहलगामला गेल्याची माहिती समोर आली असून सर्वांना सुखरूप आणण्यात येईल, असे मोहोळ यांनी सांगितले आहे

Pahalgam Terror Attack: 'सरकार तुमच्या पाठीशी', पहलगाम येथे गेलेल्या पुण्याच्या ५२० पर्यटकांना विशेष विमानाने आणणार
पुणे: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फिरायला गेलेले पर्यटक घाबरले आहेत. पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक पहलगामला गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून विशेष विमान करून त्यांना पुण्यात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना सुरक्षित घरी पोहचण्याचे सर्व विमान कंपन्यांशी बोलणे सुरू असून, विशेष विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पर्यटनासाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक लोक जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेले होते. परंतु, मंगळवारी दुर्दैवाने दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामुळे पर्यटक घाबरले आहेत. प्रत्येक जण सुखरूप घरी पोहचण्यासाठी आटापिटा करत आहे. सरकारकडून पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी मुंबई आणि पुण्याला सोडण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी दाेन वाजता मुंबईसाठी एक विशेष विमान सोडले आहे. त्यामुळे दोनशेपेक्षा जास्त पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. पुण्यातील तीन मोठे ग्रुप अडकले असून, त्यात जवळपास दीडशे ते दोनशे पर्यटक आहेत. त्यांच्यासाठी गुरुवारी विशेष विमानाची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व पर्यटक गुरुवारी पुण्यात विशेष विमानाने येतील. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूपपणे आणण्याची जबाबदारी सरकारची असून, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. फिरायला गेलेल्या नागरिकांच्या संपर्कात आम्ही आहोत. पुण्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी विशेष विमानाची तयारी केली आहे. सर्वांना सुखरूप आणण्यात येईल. कोणीही घाबरून जाऊ नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री