"तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही....!" पुण्यात गुंडाची थेट पोलीसालाच धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:29 PM2022-04-09T12:29:33+5:302022-04-09T17:45:53+5:30

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही  असाच प्रकार उघडकीस आलाय...

goons threatens police in vimananagar police station pune latest crime news | "तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही....!" पुण्यात गुंडाची थेट पोलीसालाच धमकी

"तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही....!" पुण्यात गुंडाची थेट पोलीसालाच धमकी

googlenewsNext

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. गुंडांची डेरिंग इतकी वाढली आहे की पोलिसांना देखील धमकावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही  असाच प्रकार उघडकीस आला आहे. रात्री उशिरापर्यंत चौकात गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला समज देणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यालाच चक्क धमकी देण्यात आली. "तू इथे नोकरीच कशी करतो, ते बघतो" असे म्हणून या पोलिस कर्मचाऱ्याला धमकवण्यात आले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. 

फिरोज मोहम्मद शेख (वय 25), फिरोज बशीर शेख (वय 27), कुंदन लाला कराळे (वय 26), योगेश मधुकर थोरात (वय 26) आणि सनी निकाळजे (वय 40) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक गणपत सिताराम केंगळे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रात्रपाळीच्या मार्शल ड्युटीवर असताना विमाननगर परिसरातील दत्त मंदिर चौकात गर्दी जमली असल्याचा कॉल त्यांना आला होता. त्यानंतर फिर्यादी हे आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी गेले असता आरोपी फिरोज शेख याने त्यांच्याशी वाद घातला. ' आम्ही काय गुन्हेगार आहे का, हद्दीत एवढी हॉटेल चालू आहे ते पहिले बंद कर' असे बोलून फिर्यादीचे अंगावर धावून येऊ लागला. यावेळी फिर्यादीने स्वतःच्या बचावासाठी आरोपीच्या कानाखाली मारली. 

त्यानंतर इतर आरोपी फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले आणि त्यांनी ' तुला काय करायचे ते कर, आम्ही इथले लोकल आहोत, तू आमची काय वाकडे करू शकत नाही, आमच्यावर काय गुन्हा दाखल करायचा तो कर, आम्ही सुद्धा तू इथे कशी नोकरी करतो ते बघतो" अशी धमकी दिली. इतकेच नाही तर 'तू गुन्हा दाखल केला तर, उद्या पोलीस स्टेशनला येऊन आंदोलन करतो' अशी धमकी देत फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या सर्व प्रकारानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: goons threatens police in vimananagar police station pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.