पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवणार, धमकी देणारा फोन आल्यामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:47 IST2023-02-13T10:39:51+5:302023-02-13T12:47:04+5:30
Threatening Phone Call: पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता.

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवणार, धमकी देणारा फोन आल्यामुळे खळबळ
- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल काल एका व्यक्तीने केला होता.
मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धामकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठलीही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही, त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. त्या शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५(१)(ब) व ५०६(२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैद्राबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले होते. तेथून त्यांनी आरोपीला ताब्यात घेत कारवाई केली आहे.