पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधून आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार (दि. ८) रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील १३ मार्गांवर ही मोफत सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे महिला दिनी महिला प्रवाशांना दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे.
पीएमपीच्या स्वारगेट, न. ता. वाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, अप्पर, पुणे स्टेशन, निगडी, पिंपरी आणि भोसरी या आगारांतून या खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बस सोडण्यात येणार आहे. दिवसभर जवळपास ४२ फेऱ्या होणार आहे. त्यामुळे महिला प्रवासांना तत्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एकाही मार्गावर तेजस्विनी बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू राहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. या तेजस्विनी बसमध्ये महिला वाहक सेवकांची नेमणूक करण्यात यावी, तर आगार प्रमुखांनी मार्गावरील बस स्थानकावर उपस्थित राहून महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात, तर या तेजस्विनी बसमधून केवळ महिला प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
महिला बसचे मार्ग आणि फेऱ्या
स्वारगेट ते हडपसर - ५
कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन - २
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर - २
एनडीए गेट ते मनपा - २
कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड - ७
कात्रज ते कोथरूड डेपो - ६
हडपसर ते वारजे माळवाडी - २
भेकराईनगर ते मनपा - २
मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव - २
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द - २
निगडी ते मेगा पाॅलीस हिंजवडी - ४
भोसरी ते निगडी - ४
चिखली ते डांगे चौक - २