खराडीतील नागरिकांसाठी खुशखबर..! मिळकत पत्रिका लवकरच, गुरुवारी, शुक्रवारी होणार तपासणी, कर्ज घेणे होणार सोपे,
By नितीन चौधरी | Updated: February 4, 2025 13:13 IST2025-02-04T13:06:22+5:302025-02-04T13:13:07+5:30
खराडीतील नागरिकांना मिळकत पत्रिका लवकरच, गुरुवारी, शुक्रवारी होणार तपासणी, कर्ज घेणे होणार सोपे,

खराडीतील नागरिकांसाठी खुशखबर..! मिळकत पत्रिका लवकरच, गुरुवारी, शुक्रवारी होणार तपासणी, कर्ज घेणे होणार सोपे,
पुणे : केंद्र सरकारच्या नक्शा या योजनेंतर्गत खराडीतील १३ हजार ३०० मिळकतधारकांना आता मालकी हक्काचा पुरावा असलेली मिळकत पत्रिका देण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात आली आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला व नकाशांना महापालिकेने मान्यता दिली असून प्रत्यक्ष जागेवारील नकाशा, क्षेत्र आणि जमीनधारकांची अंतिम तपासणी (चौकशी) गुरुवारी (दि. ६) व शुक्रवारी (दि. ७) करण्यात येणार आहे. मिळकत पत्रिकेमुळे जमीनमालकांची अधिकार अभिलेखात नोंदणी होऊन मिळकतींवर कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख विभागाचे संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. मिळकत पत्रिका मिळेपर्यंत सातबारा उतारा रद्द होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केेले.
जमाबंदी आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भूमि अभिलेख विभागाचे नागरी भूमापनचे उपसंचालक राजेंद्र गोळे, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक सूर्यकांत मोरे उपस्थित होते. दिवसे म्हणाले, “स्वामीत्व योजनेतून राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील ४० हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तर १६ हजार गावांमध्ये मिळकत पत्रिका देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित गावांमध्ये वर्षाअखेर मिळकत पत्रिका देण्यात येणार आहे. शहरी भागांमध्ये नक्शा योजनेतून खराडी गावाची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती.”
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी खराडी गावात नगर भूमापनाचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.
गावाची बाह्यसीमा निश्चित केल्यानंतर जमिनीवरील नियंत्रण बिंदू स्थापन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीचे काम २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले. यातून तयार झालेले मोजणीचे नकाशे महापालिकेने प्रमाणित केले आहेत. आता मिळकत पत्रिकेचे काम अंतिम करण्यात येणार असून मिळकतींची गुरुवारी (दि. ६) आणि शुक्रवारी (दि. ७) चौकशी अर्थात तपासणी केली जाणार आहे. सिटी सर्व्हे इन्क्वायरी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतीचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन नकाशा, त्याचे क्षेत्र आणि मालक अंतिम केले जाणार आहेत. चौकशीसाठी विभागातील ६० उपअधीक्षक व नगरभूमापन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर अंतिम केलेली मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नागरिकांना होणारे फायदे
- प्रत्येक मिळकतीला मिळणार मिळकत पत्रिका
- पत्रिकेवर अक्षांक्ष - रेखांशांचा उल्लेख असणार
- नागरीकांच्या मालकी हक्काचे संरक्षण
- पत्रिकेवर कर्ज घेणे सोपे होणार आहे.
पालिकेला होणारे फायदे
- खराडी गावाचा नकाशा जीआयएस आधारीत असल्याने त्याचा वापर शहर नियोजनामध्ये विकास आराखडा तयार करण्यासाठी होईल.
- ३ डी नकाशे उपलब्ध होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन करणे सुलभ
- कर आकारणी, बांधकाम परवानगी, पाणी पुरवठा, अतिक्रमण काढणे इतर कामकाजासाठी हे नकाशे उपयोगी येतील.