पुणेकरांसाठी खूशखबर...! ‘पीएमआरडीए’कडून ‘पीएमपी’ला ५०० बस मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:27 IST2025-02-14T09:26:53+5:302025-02-14T09:27:21+5:30
पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गावर ५०३ बसमार्फत प्रवासी सेवा दिली

पुणेकरांसाठी खूशखबर...! ‘पीएमआरडीए’कडून ‘पीएमपी’ला ५०० बस मंजूर
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बससेवा देण्यात येते. त्यामुळे ‘पीएमआरडीए’तर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाला स्वमालकीच्या ५०० बस देण्यास बुधवारी मंजुरी देण्यात आली. त्यासाठी २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यांत या बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.
पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गावर ५०३ बसमार्फत प्रवासी सेवा दिली जाते. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अनेक मार्ग लांब पल्ल्याचे आहेत. त्यामुळे संचालनासाठी ‘पीएमपी’ला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमपीने संचलन तूट म्हणून गेल्या वर्षी २२२ कोटी रुपयांची मागणी पीएमआरडीएकडे केली होती.
पण, पीएमआरडीएने ही रक्कम न दिल्यामुळे ५०० बस खरेदी करून देण्याची मागणी पीएमपीकडून केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. पण, या बससाठी नगरविकास खात्याची मंजुरी आवश्यक होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पीएमआरडीएकडून पीएमपीला ५०० बस खरेदी करून देण्यास मंजुरी दिली.