'साहब आपके कॉलरपर किडा है' असं सांगून पळवली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:30 IST2021-12-20T16:29:45+5:302021-12-20T16:30:23+5:30
कामगाराने मालकाच्या गळ्यातील ४५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली

'साहब आपके कॉलरपर किडा है' असं सांगून पळवली सोनसाखळी
पिंपरी : शर्टच्या कॉलरवर किडा असल्याचे सांगून कामगाराने मालकाच्या गळ्यातील ४५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. बेबेडओव्हळ गावच्या हद्दीत आढले रोडवर ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल शंकरराव ढमाले (वय ४२, रा. बेबेडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार कामगार शिवशंकर (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढमाले यांचे इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. त्यात शिवशंकर काम करतो. त्याला घरी सोडण्यासाठी ढमाले त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलरपर किडा है, असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली आणि पळून गेला.