मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:13 IST2024-12-16T19:13:31+5:302024-12-16T19:13:54+5:30
स्त्रिया अधिक संयमी व संवेदनशील असल्याने त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे

मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन
पुणे: नवं भारत एका पायावर धावू शकत नाही, तर दोन पायांवर चालायचे आहे. त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रिया व मुलींना केवळ शिक्षण नाही, तर भरपूर शिक्षण द्या. पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नूलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते. यावेळी हिरकणी योजना अंतर्गत यावर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पीयूषा पांडव या तीन मुलींना दत्तक घेतले असून, कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे.
डॉ.माशेलकर म्हणाले, वस्तुस्थिती पाहता जगाच्या तुलनेत देशात महिलांना केवळ २४ टक्केच अधिकार आहे. चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनाम ७० टक्के आणि बांगलादेशही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षांपूर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणाऱ्या नोकऱ्या महिलांना दिल्या आहेत. या देशात बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, बचत योजना, कन्या श्री प्रकल्प, शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे.