लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून युवतीचा मृत्यू, खेड तालुक्यातील दावडीची रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 21:38 IST2024-02-22T20:38:53+5:302024-02-22T21:38:54+5:30

ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती

Girl dies after falling into Lion's Point valley in Lonavala, a resident of Davadi in Khed taluka | लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून युवतीचा मृत्यू, खेड तालुक्यातील दावडीची रहिवासी

लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून युवतीचा मृत्यू, खेड तालुक्यातील दावडीची रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्क, राजगुरुनगर: २१ वर्षीय युवतीचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाला यश आले आहे. साक्षी रमेश होरे (रा. म्हासाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, खेड, पुणे) असे या मुलीचे नाव असून ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती.

मिळालेल्या माहितीनुसार साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे ( रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे फिरायला आली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीमध्ये पडली. त्याठिकाणी कड्याच्या वर एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्याने तेथील एका व्यावसायिकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळवली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाला देखील त्याठिकाणी पाचारण केले. मात्र तोवर जास्त रात्र झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.गुरुवारी सकाळी सहा वाजता शिवदुर्ग बचाव पथक लायन्स पॉईंट या घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले, सीताराम बोकड, सचिन शेलार हे देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. साहित्याची जुळवाजुळव करत रेस्क्यू पथकातील काही तरुण रोपच्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. ज्या ठिकाणाहून मुलगी खाली पडली होती, त्या ठिकाणी खाली जाऊन शोध घेतला असता दगडांमध्ये पडलेला साक्षी हिचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने दरीमधून वर काढण्यात आला.

Web Title: Girl dies after falling into Lion's Point valley in Lonavala, a resident of Davadi in Khed taluka