पुणे: मुख्यमंत्रीपदाची दोन वेळा संधी होती, मात्र ओबीसींच्या लढ्यासाठी दोनही वेळा ती संधी सोडली असा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, मात्र त्यांच्याबरोबर लग्न केलेले नाही असे ते म्हणाले. मंत्रीपद दिले नाही याचे दु:ख निश्चित होते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
युवा संसदेत बिनधास्त मुलाखत
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत शुक्रवारी सकाळी भुजबळ यांची विशेष मुलाखत झाली. लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी भुजबळ यांना विविध विषयांवर बोलते केले. भुजबळ यांनीही त्यांच्या बिनधास्त स्वभावाला साजेशी भाषा वापरत आपला राजकीय पट उलगडून दाखवला. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
सत्ता येते-जाते, लोकांसाठी काम महत्वाचे
“सत्तेत नाही तरीही चर्चेत आहात, ये बात क्या है?” या पहिल्याच प्रश्नावर भुजबळ यांनी राज्यात आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले हे समोरची मुले सांगू शकतील का? असा प्रतिप्रश्न करत सत्ता येते व जाते असे स्पष्ट केले. डॉ. बाबा आढाव किंवा त्यांच्यासारख्या अनेकांनी एका ध्येयासाठी आयुष्य वाहून घेतले. ती माणसेही समाजासमोर आहेतच की, त्यामुळे सत्तेत असले तरच लोकांसमोर राहता येते यात काही अर्थ नाही असे ते म्हणाले.
ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडले
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे सर्वसामान्य भाजी विक्रेता असलेला मी राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाले. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. तसे नसते केले तर पुढे मी शिवसेनेचा राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. त्यानंतर काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळीही मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या या दोन्ही संधी सोडून दिल्या,” असे भुजबळ म्हणाले. “पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
“भाजपसोबत आहोत, पण लग्न केलेले नाही”
“ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर पुढे अनेक वर्षे ते यासंदर्भात कायम तळ्यातमळ्यात भूमिका घेत होते. मला ते पटत नव्हते, अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत, पण भाजपसोबत लग्न केलेले नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
तेलगी प्रकरण आणि शरद पवार यांच्यावर नाराजी
“शरद पवार यांनी तेलगी प्रकरणात अतिशय घाईने माझा गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. त्यात काही नाही हे त्यांना माहिती होते. पुढे चौकशी झाली, त्यातही माझा काही संबंध नसल्याचे सिद्ध झाले. चौकशीत माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत,” असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्या त्यावेळच्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
मंत्रीपद न मिळाल्याची खंत
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी ज्येष्ठ नेता आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलो, मात्र मला मंत्रीपद मिळाले नाही. पद महत्त्वाचे नाहीच, पण मानसन्मान मिळाला नाही तर त्याचे दु:ख निश्चित होते,” असे ते म्हणाले.
“ओबीसींसाठी लढत राहणार”
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतली. त्यामुळे तोटा झाला, त्याचा फटकाही बसला व मताधिक्य कमी झाले. पण ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणे मला महत्त्वाचे वाटते. जरांगेंच्या आंदोलनात माझा वापर करून घेतला असे बोलले जाते, पण छगन भुजबळचा वापर कोणीही करून घेऊ शकत नाही,” असे त्यांनी बजावले.
तोंडाला कुलुप लावण्याचा प्रकार
“तुम्ही राज्यपाल होणार का?” या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर दिले, “हा छगन भुजबळच्या तोंडाला कुलुप लावण्याचा प्रकार आहे. ते पद मोठे आहे, मानाचे आहे, त्या पदाचा मला अवमान करायचा नाही, मात्र त्या पदावर राहून सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, भांडू शकत नाही. त्यामुळे हे पद स्वीकारणार नाही.”