गौतमीच्या वडिलांवर पुण्यात उपचार होणार; अखेर लेक धावली मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 23:32 IST2023-09-02T23:29:43+5:302023-09-02T23:32:17+5:30
पुणे - सबसे कातील गौतमी पाटील म्हणून अवघ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगना गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी ...

गौतमीच्या वडिलांवर पुण्यात उपचार होणार; अखेर लेक धावली मदतीला
पुणे - सबसे कातील गौतमी पाटील म्हणून अवघ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगना गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी समोर आली. ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजता सूरत बायपास हायवेवर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत स्थानिकांना आढळली. स्थानिकांनी स्वराज्य फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर स्वराज्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि तिथून तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गौतमी पाटीलने या वृत्ताची दखल घेतली असून त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हटले.
स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ती व्यक्ती कोण आहे यासाठी व्हायरल केला. ओळख पटवण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर १० मिनिटांत १०० हून अधिक कॉल कार्यकर्त्यांना गेले. ही व्यक्ती गौतमी पाटील यांचे वडील आहेत अशी माहिती लोकांनी दिली. तोपर्यंत कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. तरीही याची खात्री न पटल्याने रात्री नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांना प्रत्यक्ष येऊन तुम्ही शहानिशा करा असं कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकताच गौतमी पाटीलने तातडीने आपल्या मावशीला संबंधित रुग्णालयात पाठवले.
गौतमी पाटीलने एका व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती देताना, मी माझ्या वडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच, त्यांना पुण्यालाही बोलावलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू होतील. माणूसकीच्या नात्यातून मी त्यांच्यावर शक्य तेवढे उपचार करणार आहे, असे गौतमीने म्हटले. तसेच, मला या कामी तेथील समाजसेविका जयश्रीताई अहिराव यांची खूप मदत झाल्याचं गौतमीने व्हिडिओत म्हटलं आहे.
नाशिकहून पोहोचले नातेवाईक
दरम्यान, आम्हाला रात्री उशीरा माहिती मिळाली. एका मेसेजसोबत फोटो आला होता. आम्ही नाशिकहून इथे आलो आहे. संबंधित व्यक्ती माझे दीर आहेत. गौतमी पाटील ही त्यांची मुलगी आहे. गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांच्याशी काही संपर्क नाही असं महिला नातेवाईकांनी सांगितले.