चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा पूर्ण कच्चाचिठ्ठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:53 IST2025-03-08T18:48:55+5:302025-03-08T18:53:59+5:30
- लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं.

चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा पूर्ण कच्चाचिठ्ठा
- किरण शिंदे
पुणे - शहरातील शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. हा तरुण गौरव मनोज अहुजा असून, त्याच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.
या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्याने मोबाईल बंद केला असून कुटुंबासह पोलीस त्याचा शोध घेत आहे. अशात हा तरुण कोण आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे.
रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?
फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही
“माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर माझ्या तोंडावर केली आहे, त्याच्या वर्तनाची मला लाज वाटते…” हे उद्गार आहेत मनोज अहुजा यांचे, जे स्वतः या प्रकरणात जबाबदारी स्वीकारत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून, तरुणाचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांनीही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
कायदा सर्वांसाठी समान! अशा माजोरड्यांवर कठोर कारवाई होणार का?
या प्रकारानंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका शहराच्या शिस्तीचा असा भंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य वर्तन करणं हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी या मद्यधुंद माजोरड्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.