Pune| चाकणमध्ये कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्यांना तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:27 IST2021-12-15T13:19:03+5:302021-12-15T13:27:36+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली...

Pune| चाकणमध्ये कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्यांना तिघांना अटक
पिंपरी : व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरीचे प्रकार समोर येत असतानाच थेट कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नरसिंग दत्तू फड (वय ३१), अमोल गोविंद मुंडे (वय २८, दोघेही रा. बीड), राजू बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील रासे येथे कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. कॅप्सूल टँकरमधून एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये धोकादायकपणे भरून गॅसची चोरी करताना आरोपी आढळून आले.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई-
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणे चौकात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी (दि. १४) कारवाई केली. धनराज मल्लप्पा वाघे (वय २८), शुभम रघुनाथ गवळी (वय २७, दोघेही रा. रहाटणी), काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय ४९, रा. चिंचवड), अतिश अंबादास कसबे (वय २८), सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय २५, दोधेही रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख २२ हजार ५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सिलिंडरचे वजन करावे-
आपल्या घरी येत असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे वजन करून नागरिकांनी सावधानता बाळगावी. गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीकडून सिलिंडर घेताना वजन करून घ्यावे, सिलिंडरचे वजन कमी असल्यास किंवा संबंधित प्रतिनिधीने वजन करून देण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.