पुण्यात कचरा रॅम्पला भीषण आग; अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 13:22 IST2021-02-27T13:21:22+5:302021-02-27T13:22:08+5:30
अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या...

पुण्यात कचरा रॅम्पला भीषण आग; अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
धनकवडी : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज दुग्धालयासमोर असलेल्या कचरा रॅम्पला शनिवारी ( दि. २७) पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच कात्रज, कोंढवा व भवानीपेठ अग्निशामक केंद्रातील दोन अशा सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र, आगीचे कारण अदयाप अस्पष्ट आहे.
अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्राला शनिवारी पहाटे पाच वाजता कात्रज कचरा रँम्पाला आग लागल्याची खबर मिळाली. त्यानंतर कात्रज अग्निशामक केंद्रातील प्रभारी केंद्र प्रमुख संजय जाधव त्यांच्या जवानांसह काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कोंढवा अग्निशामक केंद्रातील एक गाडी व मध्यवर्ती केंद्रातील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तीन आधिकारी व वीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात झाली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात धूर असल्याने जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागत होती