पुणे : दुरुस्तीसाठी दिलेली दहा लाखांची कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी गॅरेज चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका वकिलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलांच्या मित्राने त्यांना कार वापरण्यासाठी दिली होती. न्यायालयात ये-जा करण्यासाठी ते कार वापरत होते. आरोपी गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे. हांडेवाडी परिसरात त्याचे गॅरेज आहे. वकिलाने कार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने कार दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येईल. कारचे सुटे भाग बाहेरून मागवावे लागतील, असे सांगितले. कार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून, दोन महिन्यात कार दुरुस्त करुन देतो, असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले. जुलै महिन्यात त्यांनी कार दुरुस्तीसाठी दिली.
दोन महिन्यानंतर कार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले. तेव्हा गॅरेज बंद होते. त्यांनी चौकशी केली. तेव्हा गॅरेज चालकाने भाडेतत्त्वावर गॅरेजसाठी जागा घेलली होती. गॅरेज बंद करुन चालक निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत.
जंगली महाराज रस्त्यावर दुचाकी चोरी...
जंगली महाराज रस्त्यावरील श्री पाताळेश्वर मंदिरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागात राहायला आहे. १२ सप्टेंबर राेजी सकाळी दहाच्या सुमारास त्याने श्री पाताळेश्वर मंदिरासमोर दुचाकी लावली होती. दुचाकी चोरून चोरटा पसार झाला. चोरलेल्या दुचाकीची किंमत ५० हजार रुपये आहे, असे तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे पुढील तपास करत आहेत.