Pune Crime: नगर-कल्याण रोडवर ओतूरजवळ गांजाची वाहतूक करणाऱ्यांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 17:15 IST2023-06-10T17:14:31+5:302023-06-10T17:15:38+5:30
सापळा रचून अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांना गाडीसह पकडण्यात आले...

Pune Crime: नगर-कल्याण रोडवर ओतूरजवळ गांजाची वाहतूक करणाऱ्यांना पकडले
ओतूर (पुणे) : येथील नगर-कल्याण रोडला मांडवी नदी पुलाजवळ कातकरी वस्तीजवळ गुरुवारी (दि. ८) रात्री साडेबाराच्या दरम्यान सापळा रचून १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांना गाडीसह पकडण्यात आले आहे, अशी माहिती ओतूर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
बुधवारी (दि. ७) गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरकडून कल्याण बाजूकडे पांढऱ्या रंगाची चारचाकी (एमएच १७ पीएस ०३३६) यामधून गांजाची वाहतूक होणार आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी अहमदनगर-कल्याण रोडला मांडवी नदी पुलाजवळ कातकरी वस्तीच्या बाजूला सापळा रचून गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली. दरम्यान, गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री सिद्धार्थ किशोर टेकाडे (वय ३१, रा. संगमनेर, वाडेकर गल्ली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७, रा. माळीवाडा संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्यासह पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी (एमएच १७ बीएस ०३३६), गाडीमध्ये २,१०,८०० रुपये किमतीचा १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा व अमली पदार्थ मिळून आला आहे. पोलिसांनी ४,५०,००० किमतीची पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीसह एकणू ६,६०,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.