गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 00:07 IST2025-05-14T00:05:54+5:302025-05-14T00:07:16+5:30

कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

gangster gaja marane mutton party goes viral four employees including a police officer suspended | गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. 

काय आहे प्रकरण? 

कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सुरवातीला काही दिवस तो येरवडा कारागृहात बंदिस्त होता. मात्र, पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आले. मात्र त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटेत साताऱ्याजवळील 'कनसे ढाब्या'वर पोलीस व्हॅन थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केले. इतकेच नाही तर याच वेळी दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणाऱ्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला. हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

दरम्यान काही दिवसांनी या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजली. आणि त्यांनी  तातडीने गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी केली. यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई  करण्यात आली. पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून या प्रकाराची गंभीर दखल घेतली गेली आहे.

गजा मारणेच्या साथीदारांवरही गुन्हा दाखल

गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर  सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिले. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले.

तो पण मोडला अन् गजा पुन्हा येरवडा कारागृहात

गजा मारणेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अनेकवेळा अटक झाली आहे. मात्र, अटक झाल्यानंतर त्याने ‘येरवडा कारागृहात न राहण्याचा’ पण केला असल्याची चर्चा आहे. अटकेनंतर त्याला इतर कारागृहात हलवण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकारानंतर पोलीस आयुक्तांनी त्याला पुन्हा येरवडा कारागृहातच ठेवण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर सांगली कारागृहात गेलेला गजा पुन्हा येरवड्यात आला.

Web Title: gangster gaja marane mutton party goes viral four employees including a police officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.