अंगावर घाण टाकून पैसे लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:57 IST2018-03-19T21:57:13+5:302018-03-19T21:57:13+5:30
वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़.

अंगावर घाण टाकून पैसे लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पुणे : अंगावर खुजली पावडर, घाण, वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़. त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ७ रेसर मोटारसायकली, १४ मोबाईल फोन, कोयते, सुरा, चॉपर, कटावणी, गलोर व लोखंडी धातूच्या गोळ्या, टोच्या, मिर्ची पावडर, खुजली पावडर, बिस्किट पुडे असा ४ लाख ४६ हजार ४४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़ .
चिन्ना बाबु कुनचाल्ला (वय २९, रा़ कपरालतिप्पा, बिटरगुंटा, ता़ कावलीजी, जि़ नेल्लुर, आंध्रप्रदेश), विजयकुमार शेखर रेड्डी (वय २६), सॅम्युल राज तिमोती राज (वय २५), चल्ला सनी येलीया सल्ला (वय २६), राजेश जेमीस गोगुल (वय २३), संतोष देवरकोंडा रामलुर (वय ३६), राकेश दावित आवला (वय १९), येशेबु जानु गोगला (वय ५२), शिवकुमार रविबाबु पिटला (वय ३६), उतजल सुबलु आवला (४०), सुभाष रवि बानाळु (वय २९) व्हिकअर रविबाबु पिटला (वय ३०), आमुस तिपय्या आवला (वय ३२), माधव सुंदरम गोगला (वय ३७, सर्व रा़ आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहे़. केशवनगर येथील निर्जन ठिकाणी असलेल्या बंगल्यावर ते दरोडा टाकणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले़ . याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ . हे सर्व जण आंध्र प्रदेश, तामिळनाडुच्या सीमेवरील गावात राहणार आहेत़. चित्रा कुनचाल्ला व माधव गोगला यांच्या वेगवेगळ्या दोन टोळ्या असून त्या एकाच राज्यातील व गावातील आहे़.त्या दोन्ही टोळ्या गंभीर गुन्हे करतेवेळी एकत्र येऊन दरोड्यासारखे गुन्हे करतात़ . आता पकडण्यात आलेले हे सर्व माधव गोगला टोळीतील आहे. त्या व्यतिरिक्त दोन्ही टोळ्या वेगवेगळ्या राज्यात व शहरांमध्ये जे ग्राहक बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जातात़ त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या अंगावर खुजली पावडर टाकून, अंगावर घाण पडल्याचे सांगून विविध पद्धतीने त्यांची नजर चुकवून त्यांच्याकडील पैसे असलेली बॅग चोरुन नेतात, असे तपासात निष्पन्न झाले आहे़. त्यांनी मुंढवा, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर, विमाननगर, भोसरी एमआयडीसी, पुणे ग्रामीण व ठाणे शहर व ठाणे ग्रामीण तसेच तामिळनाडू , आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे़.
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, हवालदार सोनवणे, चव्हाण, जगताप, गायकवाड, चव्हाण, शिंदे, विभुते, काकडे, भापकर यांनी ही कामगिरी केली आहे़.