लोणी काळभोर परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची टोळी पुण्यातून तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:05 IST2021-08-22T20:04:50+5:302021-08-22T20:05:09+5:30
गुन्हेगार व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करत असे

लोणी काळभोर परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची टोळी पुण्यातून तडीपार
पुणे : लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपार केले आहे.
प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी स्टेशन), अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय २०, रा. लोणी काळभोर) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय २१, रा. इराणी वस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत.
सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा आपल्या साथीदारांसह लोणी काळभोर गाव व परिसरात कोयता, कुर्हाड व इतर घातक शस्त्रेजवळ बाळगून नागरिक, व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असतात. त्यांनी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन परिसरात जबरदस्ती दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या तिघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन प्रणव शिरसाट टोळीला पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष काळे आणि त्यांच्या पथकाने तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य केले.