आता एका क्लिकवर परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:15 IST2017-07-28T06:14:50+5:302017-07-28T06:15:28+5:30
गणेशोत्सवात परवाना मिळविण्यासाठी गणेश मंडळांना यापुढील काळात वाहतूक विभाग, क्षेत्रीय कार्यालय, पोलीस स्टेशन यांचे

आता एका क्लिकवर परवाना
पुणे : गणेशोत्सवात परवाना मिळविण्यासाठी गणेश मंडळांना यापुढील काळात वाहतूक विभाग, क्षेत्रीय कार्यालय, पोलीस स्टेशन यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येणार नाही. गणेश मंडळांचा हा त्रास वाचणार असून, आता एका क्लिकवर मंडळांना परवाना उपलब्ध होणार आहे. ही परवाना प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी आणि गतिमान होण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘आॅनलाइन गणेशोत्सव परवाना प्रक्रिया’ राबविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. येत्या १ ते २० आॅगस्ट दरम्यान एक खिडकी योजनेप्रमाणे www.punepolice.co.in या वेबपोर्टलवर आॅनलाइन गणेशोत्सव परवाना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.
एकीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणाºया मंडळांमध्ये पर्यायाने वाढ झाली आहे. शहरात २८९१ नोंदणीकृत मंडळे आणि १६८८ बिगर नोंदणीकृत मंडळे मिळून सुमारे ४५७९ सार्वजनिक मंडळे आहेत.
दर वर्षी मंडळांना विविध परवाने मिळविण्यासाठी वाहतूक विभाग, महापालिका, पोलीस स्टेशन अशा विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. मात्र, या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष न जाताही यापुढील काळात मंडळांना आॅनलाइन परवाना मिळणार असल्याची माहिती सायबर सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संबंधित विभागाने परवानगी दिली अथवा नाकारली, तरी याच्या माहितीसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस विभागाकडून आॅनलाइन अंतिम परवाना संबंधिताच्या ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे. मात्र, मंडळांना रनिंग मंडप व कमानीच्या परवानगीकरिता महानगरपालिकेत रकमेचा भरणा करायचा असल्याने त्याच्या परवानगीकरिता आॅफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.