शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:13 IST2024-02-01T11:12:27+5:302024-02-01T11:13:04+5:30
पोलिसांनी पाठलाग करून संगमनेरजवळ नाशिक रोड येथून मारणेसह तिघांना ताब्यात घेतले...

शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे अखेर बुधवारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी पाठलाग करून संगमनेरजवळ नाशिक रोड येथून मारणेसह तिघांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी ही माहिती दिली.
मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एका महिना आधी मीटिंग घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. मोहोळ खूनप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले होते. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक गणेश मारणेचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, मारणेने पोलिसांना गुंगारा देऊन पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मूळ तक्रारीत गणेश मारणेचे नाव आरोपी म्हणून नाही. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांड अहवालात गणेश मारणेला फरारी म्हणून दर्शविलेले नाही. त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केला होता; परंतु मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.