Harshvardhan Patil: भाजप आगामी काळात अनेक दशके सत्तेवर राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 21:16 IST2021-10-31T21:15:37+5:302021-10-31T21:16:11+5:30
राज्यात आपली सत्ता नसतानाही सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली

Harshvardhan Patil: भाजप आगामी काळात अनेक दशके सत्तेवर राहणार
बारामती : पक्ष संघटनेच्या जोरावरच भाजप देशात सत्तेवर आहे. भाजप आगामी काळात अनेक दशके सत्तेवर राहणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. इंदापूर शहर भाजपच्या नूतन कार्यकारिणीचा व बूथ अध्यक्षांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अर्बन बँकेच्या सभागृहात रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, ''इंदापूर नगरपालिकेवर आपली सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेवकांनी शहराचा अतिशय चांगला सर्वांगीण विकास केला. राज्यात आपली सत्ता नसतानाही सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. शहरात पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले, ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्यात आले.''
''स्वच्छतेचा पाच कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळाला. शहराचा सर्वांगीण विकास केल्यामुळे आगामी काळातही नगरपालिकेवर भाजपची सत्ता कायम राहणार आहे. प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष व संघटनेला महत्त्व असते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत पक्षाने घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांनी अंतिम समजला पाहिजे. सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने, एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.''