‘टास्क’चा फंडा, कष्टाच्या पैशाला गंडा! 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड'नंतर आता 'टास्क फ्रॉड'

By नम्रता फडणीस | Published: November 4, 2023 12:23 PM2023-11-04T12:23:56+5:302023-11-04T12:24:19+5:30

टास्क निवडल्यानंतर त्यांना ७ हजार रुपये पाठविण्यास सांगितले आणि त्यांनी पाठविले....

Fund of 'Task', money of hard work! After 'Sex Torsion', 'Link Based Fraud' Now 'Task Fraud' | ‘टास्क’चा फंडा, कष्टाच्या पैशाला गंडा! 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड'नंतर आता 'टास्क फ्रॉड'

‘टास्क’चा फंडा, कष्टाच्या पैशाला गंडा! 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड'नंतर आता 'टास्क फ्रॉड'

पुणे : व्हाॅट्सॲपवर एकाला यूट्यूबवरील व्हिडीओला लाइक करा, जर लाइक केले, तर ५० रुपये मिळतील, असे तीन व्हिडीओ लाइक केले, तर १५० रुपये मिळतील, असे सांगितल्यावर ३१ वर्षीय इंजिनिअरने संबांधित प्रोफाइलवर संपर्क केला. त्यांनी इंजिनिअरला बँकेचे डिटेल्स मागितले. इंजिनिअरने स्वतःच्या बँकेचा क्रमांक पाठविला. त्यांना सायबर चोरट्यांनी टेलिग्रामवरील टास्क ग्रुपमध्ये ॲड केले. त्यांना टास्क निवडण्यास सांगितले. त्यांनी टास्क निवडल्यानंतर त्यांना ७ हजार रुपये पाठविण्यास सांगितले आणि त्यांनी पाठविले.

अशी वेळोवेळी विविध खात्यांमध्ये त्यांनी रक्कम जमा केली. संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये पेटीएमद्वारे रक्कम जमा केली खरी; पण त्या व्यक्तीच्या खात्यासंबंधी मेसेज ग्रुपवरून लगेच डिलीट करण्यात आल्यामुळे इंजिनिअरकडे त्या खात्याचा नंबरच उपलब्ध नाही. अशा प्रकारे सध्याच्या काळात 'सेक्स एक्स टॉर्शन', 'लिंक बेस्ड फ्रॉड' नंतर आता 'टास्क सायबर फ्रॉड' हा नवा ट्रेंड सायबर पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. इतक्या चलाखीने सायबर चोरटे ऑनलाइन गंडा घालत असल्याने या चोरट्यांना शोधणे हेच पोलिसांमोरील मोठे आव्हान बनले आहे.

'टास्क सायबर फ्रॉड ही नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी सायबर चोरट्यांनी लढविलेली अनोखी शक्कल आहे. त्यासाठी ‘टेलिग्राम’ या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. अगदी उच्चशिक्षित तरुण, इंजिनिअर, आयटीमधील तरुणही या फसवणुकीचे शिकार ठरत आहेत.

काय आहे 'टास्क सायबर फ्रॉड?

तुम्हाला पार्ट टाइम जॉब करण्याची अनोखी संधी आहे, घरबसल्या पैसे कमवा, अशा प्रकारचे मेसेज एका अनोळखी क्रमांकावरून तुम्हाला पाठविले जातात. जर तुम्ही या प्रोफाइलला प्रतिसाद दिलात, तर तुम्हाला प्रोफाइलची संपूर्ण माहिती दिली जाते आणि विदेशी कंपनीशी कसे जोडले गेलो आहोत, याची माहिती दिली जाते. आजपर्यंत किती लोकांनी पैसे कमावले आहेत, याची माहिती देऊन तुमचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर तुम्हाला टास्कची माहिती पाठविली जाते. त्यातील एक टास्क निवडण्यास सांगितले जाते आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते, तेव्हाच तो व्यक्ती सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतो. अशा प्रकारे टास्क सायबर फ्रॉडच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

तुमचे डेबिट- क्रेडिट कार्ड डिटेल्स, ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही शेअर करू नका, असे आवाहन वारंवार सायबर पोलिसांकडून केले जात असले तरी शिक्षित व्यक्तीच या चुका पुन्हा पुन्हा करताना दिसतात. दरवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन शक्कल लढवीत सायबर चोरटे गुन्हेगार अगदी सहजरीत्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असून, दुसरीकडे सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही अल्प असल्याने पोलिसांसमोर हे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान मोठे आहे. यासाठी नागरिकांनीही आपली फसवणूक न होण्यासाठी थोडे जागरूक राहून सावधानता बाळगणेही गरजेचे आहे.

ज्या इंजिनिअर व्यक्तीची टास्क सायबर फ्रॉडअंतर्गत फसवणूक झाली आहे. त्यांचा एक खाते क्रमांक आम्हाला मिळाला आहे. यात गुन्हा दाखल झाला किंवा तक्रारीचा अर्ज असेल, तर त्या संबंधित व्यक्तीच्या खात्याची बँकेकडून माहिती घेतली जाते. जर त्यात पैसे असतील, तर त्याचे अकाउंट गोठवले जाते. त्या इंजिनिअरच्या खात्यात एकही पैसा शिल्लक नाही. त्या खाते क्रमांकावरून इतर खाते क्रमांक शोधण्यासाठी बँकेला पत्र दिले आहे. त्यांच्याकडून तो मिळाला, तर पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतील. खात्यावर पैसे नसतील, तर ते परत मिळणे अवघड असते.

-सीमा ढाकणे, सहायक पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस स्टेशन

Web Title: Fund of 'Task', money of hard work! After 'Sex Torsion', 'Link Based Fraud' Now 'Task Fraud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.