मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये एकास गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:40 IST2018-06-15T21:40:43+5:302018-06-15T21:40:43+5:30
एटीएम केंद्रात रोकड भरण्यासाठी गेलेल्या एकाकडे बतावणी करून चोरट्याने सोळा हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली.

मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये एकास गंडवले
पुणे : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या टिळक रस्त्यावरील एटीएम केंद्रात रोकड भरण्यासाठी गेलेल्या एकाकडे बतावणी करून चोरट्याने सोळा हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. संजय चव्हाण (वय ५०, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे गुरुवारी ( १४ जून) दुपारी टिळक रस्त्यावरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रात रोकड भरण्यासाठी गेले होते. चव्हाण यांच्याकडे ४८ हजारांची रोकड होती. चव्हाण यांच्या पाठोपाठ एटीएम केंद्रात एकजण शिरला. त्याने चव्हाण यांच्या नोटा हातात घेऊन खालीवर केल्या. तसेच या नोटा चालणार नाहीत, यावर सही घ्या, अशी बतावणी केली. त्यानंतर एटीएममध्ये रोकड भरणाऱ्यास मदत करण्याचा बहाणा केला. चव्हाण यांचे लक्ष नसल्याची संधी साधून दोन हजारांच्या आठ नोटा चोरट्याने लांबविल्या. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.