मुंबई : वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी नवी मुंबईतील ऐरोली येथे एका ट्रकचालकाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला पुण्यातील घरात डांबून ठेवले. या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. ट्रकचालकाचे अपहरण करून त्याला शिळे अन्न दिले गेले आणि जीव मारण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार दिलीप खेडकर यांच्या घरी घडला. या प्रकरणात पोलिसांनी अपहरण, खंडणी आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर सध्या फरार आहेत, तर त्यांचा अंगरक्षक अटकेत असल्याचे समोर आले आहे.
खेडकर कुटुंबासाठी चालक म्हणून काम करणारा प्रफुल्ल सालुंखे याला नवी मुंबई बेलापूर न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिलीप आणि मनोरमा खेडकर अजूनही फरार असून पोलिसांच्या मते ते देशाबाहेर पळून गेले असावेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
नवी मुंबईतील तुर्भे MIDC येथे राहणाऱ्या २२ वर्षीय प्रल्हाद कुमारचे अपहरण १३ सप्टेंबर रोजी झाले. मुलुंड–ऐरोली रोडवरील चौकात त्याच्या ट्रकने दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझरला धडक दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर खेडकर यांनी त्याला ओलीस धरले आणि ट्रक मालकाकडून नुकसानभरपाईची मागणी केली. आपल्या जबाबात प्रल्हाद कुमारने सांगितले की, दिलीप खेडकर आणि त्यांचे चालक-सह-अंगरक्षक प्रफुल्ल सालुंखे यांचा ट्रकचालकाशी वाद झाला. त्यानंतर “पोलिस स्टेशनला नेतो” असे सांगत त्याला गाडीत बसवले. मात्र प्रत्यक्षात त्याला शनिवारी सायंकाळी पुण्यातील त्यांच्या घरी नेण्यात आले.
शिळे अन्न दिले, हत्या करण्याची धमकी दिली
प्रल्हाद कुमारचा आरोप आहे की, गाडीत बसवल्यानंतर त्याचा मोबाईल फोन काढून घेतला आणि गप्प राहण्याची धमकी देण्यात आली. घरी पोहोचल्यावर त्याला एका खोलीत बंद करण्यात आले. ही खोली चौकीदार किंवा स्वयंपाक्यासाठी असावी असा अंदाज वर्तवण्यात येतो. प्रल्हाद कुमारने सांगितले की, त्याला शिळे अन्न देण्यात आले आणि ट्रक मालकाला फोन करून कारच्या नुकसानीसाठी पैसे मागण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
पुरावे नष्ट केल्याचा आरोप
ट्रक मालकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर नवी मुंबई पोलिसांची टीम रविवारी पहाटे खेडकर यांच्या घरी पोहोचली आणि प्रल्हाद कुमारची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुरावे नष्ट करण्यासाठी दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा यांनी खोलीची किल्ली इतरत्र दिली होती आणि सीसीटीव्हीचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर काढून टाकला होता.
मनोरमा खेडकरने पोलिसांसोबत घातला वाद
ट्रकचालकाला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला. कुत्रे अंगावर सोडण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पोलीस माघारी फिरले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मनोरमा खेडकरला समन्स बजावले होते. मात्र ती चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलीस सोमवारी दुपारी तिच्या घरी गेले. त्यावेळी घराचे गेट बंद होते. पोलिसांनी गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. तेव्हा घराचे दरवाजेही बंद होते. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घरात कुणी आहे का याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. अखेर नोटीस घरावर लावून पोलीस परतले.
खेडकर दाम्पत्याचा शोध सुरू
अपहरणाच्या गुन्ह्याशिवाय आरोपींवर पोलिसांनी खंडणी आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोपही जोडले आहेत. अंगरक्षक सालुंखे याला अटक करण्यात आली आहे. मात्र खेडकर दाम्पत्य फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने दिलीप खेडकर यांची मुलगी पूजा खेडकर हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) बडतर्फ केले होते.