वीजपुरवठा वारंवार खंडित; चार्जिंग होण्यास लागतोय वेळ, ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबई प्रवास धाकधुकीतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:17 IST2025-07-11T11:16:42+5:302025-07-11T11:17:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट आणि पुणे स्टेशन भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने ई-शिवनेरी बसचे चार्जिंग पूर्ण क्षमतेने होण्यास अडचण होत आहे

वीजपुरवठा वारंवार खंडित; चार्जिंग होण्यास लागतोय वेळ, ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबई प्रवास धाकधुकीतच
पुणे : स्वारगेट, पुणे स्टेशन या दोन्ही आगारांतून बोरिवली, दादर आणि ठाणे या ठिकाणी दर अर्ध्या तासाला ई-शिवनेरी बस धावतात. पुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात. पण या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे बस पूर्ण चार्जिंग होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना धाकधुकीतच पुणे-मुंबई प्रवास करावा लागत आहे. याकडे एसटी प्रशासन कधी लक्ष देणार, असा सवाल प्रवासी करत आहेत.
पुण्याहून पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत दादर, बोरिवली, ठाणे या मार्गावर अर्धा एक तासाला ई-शिवनेरी बससेवा आहे. या मार्गावर स्वारगेट येथून जवळपास ८८ आणि पुणे स्टेशन येथून दादरसाठी ३७ ई-शिवनेरी धावतात. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचा या बस प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट आणि पुणे स्टेशन भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने ई-शिवनेरी बसचे चार्जिंग पूर्ण क्षमतेने होण्यास अडचण होत आहे. त्यामुळे दुपारनंतर बस चार्जिंग नसल्यामुळे बंद पडण्याची अथवा पुन्हा चार्जिंग करण्याची वेळ येत आहे. शिवाय प्रवासातच बसमध्ये चार्जिंग कमी आहे. बस बंद पडल्यानंतर उतरावे लागेल, असे चालकांकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बस सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या
पुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात. पण, या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा फटका चार्जिंग करण्यावर होतो. शिवाय सकाळच्या टप्प्यात सोडण्यात आलेल्या ‘एक्स्प्रेस वे' होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बस पोहोचायला उशीर होतो. शिवाय बस पुण्यात दाखल झाल्यावर चार्जिंगसाठी दोन तास वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते.
पुण्याहून ठाण्याला जाण्यासाठी ई-शिवनेरी बस आहेत. सकाळी अकरा वाजता असलेली बस उपलब्ध नसल्याने दुपारी बारापर्यंत वाट पाहात थांबावी लागली. बऱ्याच वेळा या बस उशिरा धावतात. याची गैरसोय प्रवाशांना होते. - प्रथमेश पाटील, प्रवासी