ससूनमध्ये रुग्णाला मिळाला तब्बल ४८ लाखांचा मोफत ‘डोस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 20:45 IST2020-03-02T19:54:14+5:302020-03-02T20:45:54+5:30
हिमोफिलिया आजार असलेला ३५ वर्षीय रुग्ण अंघोळ करताना बाथरूममध्ये पडला होता चक्कर येऊन

ससूनमध्ये रुग्णाला मिळाला तब्बल ४८ लाखांचा मोफत ‘डोस’
पुणे : हिमोफिलिया या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णावर खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियेपर्यंतचे तब्बल ४८ लाखांचे उपचार मोफत करण्यात आले. यामध्ये शस्त्रक्रियेसाठी लागणारी ४२ लाखांची ११७ इंजेक्शन आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेचा ६ लाखांचा खर्चही शासकीय योजनेतून करण्यात आला.
हिमोफिलिया आजार असलेला ३५ वर्षीय रुग्ण अंघोळ करताना बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. त्याचे मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. त्याच्यावर मागील वर्षी दि. २३ नोव्हेंबरला ससून रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी रुग्णास शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी तीन फॅक्टर ८ चे इंजेक्शन देण्यात आले. पण रुग्णाच्या पायाची सूज कमी झाली नाही. त्यामुळे करण्यात आलेली इनहिबिटरची चाचणी पॉझिटिव्ह आली.
रक्तात इनहिबिटर असताना फॅक्टर ८ चे डोस निरुपयोगी ठरतात. त्यासाठी ‘फिबा’ हे इंजेक्शन द्यावे लागते. ही इंजेक्शन राज्याच्या आरोग्य विभागाकडून मोफत उपलब्ध करून दिली जातात. त्यानुसार डॉ. सतीश पवार आणि डॉ. आर. टी. केंद्रे यांनी ११७ इंजेक्शन मिळवून दिली. या औषधांची मूळ किंमत ४२ लाख १२ हजार रुपयेएवढी आहे. या रुग्णावर नुकतीच हेमिआर्थ्रोप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत खुब्याचा बॉल बदलण्यात आला. या शस्त्रक्रियेचा खासगी रुग्णालयातील खर्च सुमारे ६ लाख रुपयेएवढा असतो. हा खर्चही विविध योजनांमधून करण्यात आला.
हा अनुवंशिक आजार आहे व रुग्णास इजा झाल्यास रक्तस्राव लवकर बंद होत नाही. रुग्णाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून करण्यात आलेले मोफत उपचार वरदान ठरले. डॉ. चंदनवाले, डॉ. राहुल पुराणिक आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. सोनाली साळवी यांनी हिमोफिलियावर उपचार केले. डॉ. सूरज जाधवर व डॉ. योगेश गवळी यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन यांनीही मार्गदर्शन केले. ‘रुग्णालयातील उपचारांचा दर्जा उंचावला असून गरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहे,’ असे डॉ. चंदनवाले म्हणाले.