जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत एसटी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:44 IST2018-10-31T01:44:08+5:302018-10-31T01:44:23+5:30
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत एसटी पास
पुणे : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असलेल्या दहा तालुक्यांना होणार आहे.
राज्य सरकारने नुकतेच दुष्काळसदृश तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यापाठोपाठ एसटी महामंडळानेदेखील ही घोषणा देत विद्यार्थ्यांना दिवाळी भेट दिली आहे. जिल्हा प्रशासनाने १३ पैकी १० तालुक्यांतील गंभीर स्थिती असल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे हे तालुके आहेत. त्याचा फायदा या तालुक्यातील विद्यार्थ्यांना होईल.
शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्केइतकी सवलत देण्यात येते. आता दुष्काळामुळे ही सवलत शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्यासाठी महामंडळावर ८५ कोटी रुपयांचा बोजा पडणार असून, सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल, असे एसटीकडून सांगण्यात आले. ही सवलत चालू वर्षीच्या उर्वरित शैक्षणिक कालावधीसाठी लागू राहील.