वॉरंटवर निर्मला सीतारामन यांची खोटी सही; डिजिटल अरेस्ट करुन LIC अधिकाऱ्याचे बँक खाते केले रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:30 IST2025-11-12T14:30:03+5:302025-11-12T14:30:29+5:30
पुण्यात एका महिलेची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या खोट्या सहीचे पत्र दाखवून फसवणूक करण्यात आली.

वॉरंटवर निर्मला सीतारामन यांची खोटी सही; डिजिटल अरेस्ट करुन LIC अधिकाऱ्याचे बँक खाते केले रिकामे
Pune Cyber Fraud: गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बनावट बँक अधिकारी किंवा कुरिअर कंपनीचे कर्मचारी म्हणून फसवणूक केली जात होती. पण आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट सह्या वापरल्या जात आहेत. पुण्यातील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त एलआयसी अधिकाऱ्याला, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बनावट सहीचे अटक वॉरंट दाखवून, जवळपास एक कोटी रुपये देण्यास करण्यास भाग पाडण्यात आले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बनावट स्वाक्षरी असलेले अटक वॉरंट दाखवून पुण्यातील सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची तब्बल ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या मार्गाचा वापर करून महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिला आपले सर्व पैसे 'व्हेरिफिकेशन'साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले. पुणे शहर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, एका वरिष्ठ मंत्र्याच्या बनावट सहीचा वापर करून केलेली ही फसवणूक हा एक गंभीर प्रकार मानला जात आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोथरूड येथे राहणाऱ्या या महिलेला एका व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने स्वतःला 'डेटा प्रोटेक्शन एजन्सी'चा प्रतिनिधी म्हणून ओळख दिली. त्याने महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर फसव्या व्यवहारांसाठी झाल्याचा खोटा आरोप केला. यानंतर महिलेला जॉर्ज मॅथ्यू नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी जोडण्यात आले. या व्यक्तीने व्हिडिओ कॉलवर महिलेवर मनी लाँड्रिंगचा आरोप लावला आणि तिची बँक खाती गोठवण्याची धमकी दिली.
फसवणूक करणाऱ्यांनी आपला दावा खरा वाटावा यासाठी पुढील मोठी चाल खेळली. सायबर गुन्हेगारांनी महिलेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बनावट स्वाक्षरी असलेले आणि शासकीय शिक्का असलेले खोटे अटक वॉरंट पाठवले. महिलेचे वय लक्षात घेऊन तिला थेट अटक न करता डिजिटल अरेस्ट केली जाईल, असे सांगण्यात आले. यातून सुटका करण्यासाठी आणि व्हेरिफिकेशनच्या नावाखाली महिलेला आपले सर्व पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध खात्यांमध्ये त्वरित हस्तांतरित करण्याचे सांगण्यात आले.
या धमक्यांना घाबरून महिलेने टप्प्याटप्प्याने जवळपास ९९ लाख रुपये अनेक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. फसवणूक करणाऱ्यांनी आपला खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी महिलेला ईडीच्या बनावट पावत्या देखील पाठवल्या. जेव्हा महिलेने नंतर कॉल करणाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे नंबर बंद आले. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच, महिलेने पुणे शहर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली बँक खाती आणि फोन नंबरचा तपास सुरू केला आहे