‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 21:36 IST2025-11-12T21:35:36+5:302025-11-12T21:36:05+5:30
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची चार राज्यांत पाच हजार किलोमीटर प्रवास करून कारवाई

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
पिंपरी : जेष्ठ नागरिकांना “ब्ल्यू डार्ट” व “मुंबई पोलिस” अधिकारी असल्याचे भासवून दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील अंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात संशयितांना कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि मुंबई अशा चार राज्यांत तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून अटक करण्यात आली.
मोहम्मद आमेर अखील मोहम्मद आरीफ (वय ३५, रा. हैद्राबाद), जिगर जितेश पटेल (२३, रा. मुंबई), अजिथ विजयन (३६, रा. तिरुअनंतपुरम, केरळ), सचिन पी. प्रकाश (२६, रा. कर्नाटक), मोहम्मद रिहान मोहम्मद तजमुल (१८, रा. म्हैसूर), सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत (२०, रा. म्हैसूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी जेष्ठ नागरिकांना संशयितांनी व्हॉट्सअॅप व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला “ब्ल्यू डार्ट अधिकारी” आणि “मुंबई पोलिस अधिकारी” असल्याचे भासवले. त्यांनी “तुमच्या नावाचे पार्सलमध्ये ड्रग्ज, लॅपटॉप आणि कागदपत्रे सापडली आहेत; त्यामुळे अटक होऊ शकते” अशी भीती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक करून संशयितांनी फिर्यादींना विविध खात्यांवर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, किरण देवकर, श्रीकांत कबुले, ज्ञानेश्वर गवळी, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नीलेश देशमुख, अभिजित उकिरडे, महेश मोटकर, अनिकेत टेमगिरे, संतोष सपकाळ, दीपक माने, शुंभागी ढोबळे, दीपाली चव्हाण, स्वप्नील खणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात सहभाग
प्राथमिक तपासात संशयितांच्या बँक खात्यांमधून सात कोटी ८६ लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले. मुख्य संशयित मोहम्मद आमेर हा महाराष्ट्र सायबरकडील ५८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
देशभरातून ३१ तक्रारी
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर विविध राज्यांत सलग कारवाई करत सर्व संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या खात्यांवर देशभरातील ३१ तक्रारी नोंद झाल्याचेही समोर आले आहे.