पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून २ महिलांची फसवणूक, तब्बल १५ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 16, 2023 16:06 IST2023-07-16T15:59:52+5:302023-07-16T16:06:32+5:30
सिंहगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तसेच बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून २ महिलांची फसवणूक, तब्बल १५ लाखांचा गंडा
पुणे: महापालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून दोन महिलांची फसवणूक केल्याची घटना धायरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी आशिष चंद्रकांत तावडे (रा. कर्वेनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुचिरा सचिन गुरव (वय २७, रा.धायरी) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मामी मीरा गुरव आणि आईची मैत्रीण पूजा फुले यांची तावडेने फसवणूक केली. महापालिकेत नोकरी लावून देतो सांगून वेळोवेळी दोघींकडून पैसे उकळले. वेगवेगळी कारणे सांगून तावडे याने तब्बल १५ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यांनतर बनावट नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा नोकरी अर्ज मान्य झाला असल्याचे सांगितले. मात्र अधिक माहिती मिळवली असता अशी कोणत्याही प्रकारची नोकरीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत तावडेला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तसेच बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर पुढील तपास करत आहेत.