भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 19, 2023 17:37 IST2023-11-19T17:36:55+5:302023-11-19T17:37:56+5:30
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक
पुणे : भावाच्याच बँक खात्याचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाख २३ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३० वर्षीय महिलेने अनिल कुमार (वय- ३०) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. आरोपीने त्यांचा भाऊ सुनील कुमार हे मयत झाल्याचे माहिती असून सुद्धा त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन बँकिंगच्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरला. या माहितीचा वापर करून सुनील कुमार यांच्या बँक खात्यातून १८ लाख २३ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. ही बाब सुनील कुमार यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अनिल कुमार याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके हे करत आहेत.