चॉकलेटचे आमिष दाखवत चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, हडपसर भागातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 10:36 IST2024-04-05T10:35:16+5:302024-04-05T10:36:01+5:30
बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत....

चॉकलेटचे आमिष दाखवत चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, हडपसर भागातील धक्कादायक घटना
पुणे :हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
याप्रकरणी बालिकेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची चार वर्षांची मुलगी बुधवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथे २० ते २२ वर्षांचा तरुण आला. त्याने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवले. घरापासून काही अंतरावर असलेल्या माेकळ्या जागेतील पत्र्याच्या खोलीत बालिकेला नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे राहणाऱ्या एका तरुणाने बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकला.
संबंधित तरुण तेथे गेला. तरुण आल्याचे पाहून आरोपी बालिकेला तेथे सोडून पसार झाला. या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे करत आहेत.