'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: March 7, 2024 16:04 IST2024-03-07T16:03:15+5:302024-03-07T16:04:11+5:30
चांगला परतावा मिळेल तसे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले

'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा
पुणे: दिलेले टास्क पूर्ण केल्याचा चांगला परतावा मिळेल तसे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेसह चौघांची १ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. ०६) वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनमध्ये वारजे परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेला चॅनेल सबस्क्राईब केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून ४७ लाख ७३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र परतावा न देता फसवणूक केली आहे. दुसऱ्या घटनेमध्ये कोथरूड परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय युवकाला वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला नफा असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वेगवगेळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ३९ लाख ५३ हजार रुपये भरण्यास सांगितले. तिसऱ्या घटनेत, वानवडी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला हॉटेल रेटिंगचा टास्क देऊन ९ लाख ४७ हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. चौथ्या घटनेमध्ये, वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाला पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून ६ लाख ७४ हजार रुपये भरण्यास फसवणूक केली आहे.