Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:02 IST2025-02-17T13:01:43+5:302025-02-17T13:02:30+5:30
मुलगी जन्माला आल्यानंतर मूत्रपिंडाचे विकार सुरू झाले होते. तपासणी केल्यावर लक्षात आले की जन्मजातच बाळाला दोनऐवजी चार मूत्रपिंडे आहेत

Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला
वानवडी : जन्मजातच मूत्रपिंडाचा विकार असलेल्या आठ महिन्यांच्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रियेच्या साहाय्याने रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर मूत्रपिंडाचे विकार सुरू झाले होते. तपासणी केल्यावर लक्षात आले की जन्मजातच बाळाला दोनऐवजी चार मूत्रपिंडे आहेत. याचा अर्थ प्रत्येक बाजूला एक मूत्रपिंड असण्याऐवजी तिच्याकडे दोन्ही बाजूला दोन स्वतंत्र मूत्रपिंड युनिट्स होते.
उजव्या बाजूच्या मूत्रपिंडाचा वरचा भाग मोठ्या प्रमाणात सुजलेला होता, कारण त्याची मूत्रवाहिनी चुकीच्या ठिकाणी जोडली गेली होती. मूत्राशयात निचरा होण्याऐवजी, ते थेट मूत्रमार्गात जात होते, ज्यामुळे वारंवार मूत्रसंक्रमण होत होते. अशा वेळी दा विन्सी सर्जिकल रोबोटचा वापर करत सुजलेला भाग काढून टाकण्याऐवजी, रोबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या मूत्रवाहिनीला सामान्य मूत्रवाहिनीशी जोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप असून मूत्रप्रवाह योग्यरीत्या मूत्राशयात होऊ लागला. कमी छेद असलेल्या प्रक्रियेमुळे बाळाला वेदना कमी झाल्या, संसर्गाचा धोका टळला, अशी माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली.