पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:28 IST2025-12-20T11:28:32+5:302025-12-20T11:28:54+5:30
भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे

पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश शनिवारी (दि. २०) मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीच्या तिकिटासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यात ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे. त्या भागात अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांचा शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांचे पुत्र हेमंत बागूल, शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, धनकवडीतील एका माजी नगरसेवकाचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. यावेळी पुणे शहरातील भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे.