Former MLA Harshvardhan Jadhav remanded in judicial custody for one day; Departure to Yerawada Jail | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी; येरवडा तुरुंगात रवानगी 

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी; येरवडा तुरुंगात रवानगी 

पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (वय ४३) यांना शुक्रवारी ( दि. १८) त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने जाधव यांना एक दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची आता रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

याप्रकरणी अमन चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास औंध येथील संधवीनगर येथे घडली होती. यात अजय चरणजितलाल चड्डा (वय ५५) आणि ममता अजय चड्डा (वय ४८) हे जखमी झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण...  
अजय चड्डा व ममता चड्डा हे दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने त्यात ममता चड्डा यांच्या पायाला लागले. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता जाधव यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याबरोबरील महिला इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांनीही शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. चड्डा यांनी आपली ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितल्यानंतरही जाधव यांनी मारहाण केली.

त्यानंतर चड्डा यांच्या मुलांनी दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना वाटेत जाधव यांची गाडी जाताना दिसली. ते त्यांच्या मागोमाग गेले. आंबेडकर चौकाच्या अलीकडे जाधव यांच्या गाडीने आणखी एकाला धडक दिल्याने तेथे लोकांनी जाधव यांना मारहाण केली. त्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी जाधव यांना औंध चौकीत नेले. जाधव यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी जाधव यांना औंध रुग्णालयात नेले. तेथून रात्री ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. तेव्हा आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर १५ डिसेंबरला दुपारी ते ससून रुग्णालयातून उपचार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेत असताना रात्री ९ वाजता त्यांनी पुन्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्यावर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा
आपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी सांगितले की, आपण बावधन येथे दुकानात गेलो असताना माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. त्याविरोधात आपण पोलिसांकडे तक्रार द्यायला गेला असताना आपली तक्रार घेण्यात आली नाही. राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former MLA Harshvardhan Jadhav remanded in judicial custody for one day; Departure to Yerawada Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.