शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 22:14 IST2025-06-28T22:13:05+5:302025-06-28T22:14:49+5:30
Tanaji Sawant Hospitalized News: तानाजी सावंत यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू असून, तूर्तास प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
Tanaji Sawant Hospitalized News: शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आमदार तानाजी सावंत यांना दुपारी सुमारे ४.३० वाजता चक्कर येऊन उलटी झाल्यामुळे हृदयाची धडधड वाढली. यावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हृदयाचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात तानाजी सावंत यांना दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपाचारांमुळे तानाजी सावंत यांची प्रकृती थोडी स्थिर होत असल्याचे सांगितले जात आहे. उद्या तानाजी सावंत यांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. तूर्तास तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
रुग्णालयात दाखल होताच आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तत्काळ त्यांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत. वाद आणि तानाजी सावंत यांचे नाते कायम असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. शिवसेना शिंदे गटाचे मोठे नेते म्हणून तानाजी सावंत परिचित आहेत. तानाजी सावंत मोठे व्यवसायिक असून, त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.